मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

कडी-२ (जुन्या पद्धतीची वरुन घालायची कडी/आडना)

डाउनलोड कडी-२ जुन्या पद्धतीची वरुन घालायची कडी,आडना

नोंदीत दिलेल्या पर्यायांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

पूर्वीच्या काळातील घरांचे दरवाजे बंद करण्याकरता ज्या पद्धतीची कडी वापरली जात असे त्या ‘आडना’ या संकल्पनेकरता सदर सर्वेक्षणात कडी, कोयंडा, आगळ, आडना, खिट्टी, खटका, आडा, आडगुना, आडची, आडसर, दांडका, बिजीगिरी, मिच़गार्‍या, टीच़कनी, साखर्‍या, संकलकडी, पट्टीकडी, डांबर्‍या, माकडी, कुत्रं, घोडी, माज़रबोक्या, हुक, चाप, खांदुक, खडकं, इ. असे शब्दवैविध्य दिसून आले आहे.

यापूर्वी झालेल्या धोंगडे (२०१३) या भाषिक सर्वेक्षणामध्ये या संकल्पनेसाठी महाराष्ट्रातील बोलींमध्ये फार थोडे वैविध्य असल्याची नोंद आहे. आडना या शब्दाखेरीज साखळी या एकाच वेगळ्या शब्दाची नोंद आहे.

कडी हा शब्द सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात आढळून येतो. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे कडी, कळी, करी, कॉडी, पट्टीकडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कळी हे वैविध्य औरंगाबाद, नाशिक, धुळे, अमरावती या जिल्ह्यात आढळते. तर करी हे रायगड आणि पालघरमध्ये क्वचित आढळते. कुंडी/ कुंडा हा शब्द प्रामुख्याने विदर्भात आढळून येतो. तसेच ठाणे, बीड, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यांत अतितुरळक दिसून आला आहे. कोंडा हा शब्द मराठवाडा आणि विदर्भात जास्त प्रमाणात आढळून येतो. अशिक्षित आणि कमी शिक्षित मोठ्या वयोगटातील लोक हा शब्द जास्त प्रमाणात वापरतात. या शब्दाचे कोंडी, कोंडा, कोंडं, कोंडे, कोंडका, कोंडकं, कोंडकी, कोंडंकं, कोंडगं, कोनका, कोडकं इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कोयंडा हा शब्द रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिधुदुर्ग, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत बर्‍याच प्रमाणात आढळून येतो. तर कोल्हापूर, पुणे, नंदुरबार, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांत काही प्रमाणात आढळतो. या शब्दाचे कोयंडा, कोईंडा, क्वईंडा, क्वयंडी, कयनं, कुईंडा, क्वयंडा, कोयडा, कोयंड्या, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कडीक्वयंडा हा शब्द जळगाव, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, बीड, ठाणे, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे कडीकोंडा, कडीकोंडो, कडीक्वयंडा, करीकोंडा, कडीकोंडं, कडोकोंडो, कडी कोइंडा, तडी कोंडा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

आगळ हा शब्द उस्मानाबाद, लातूर, बीड, बुलढाणा, अहमदनगर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसेच औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, पुणे, अमरावती या जिल्ह्यांत काही प्रमाणात वापरल्याचे निदर्शनास आले. अकोला, जळगाव, वर्धा, हिंगोली, सांगली, या जिल्ह्यांत हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे आगळ, अगळ, आगाळ, आगळी, आगडं, आखळ, आगई, आगय, गळ, आगळना इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

आडना हा शब्द प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत आढळून येतो. या शब्दाचे आडना, अडना, आडनो, आडनी, आडणी, आडनं, आडन, आळणी, आळना इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. आडा हा शब्द सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, जळगाव, गडचिरोली इ. जिल्ह्यांत आढळतो. याचे आडं, आडा, आडो, आडी, आडु, आड्या, आढी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. आडगळ हा शब्द कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, पुणे, बीड इ. जिल्ह्यांत आढळतो. याचे आडगळ, आडग़ाळा, आडगुना इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. आरगळा हा शब्द केवळ परभणी जिल्ह्यात दिसून आला आहे. तर आरगोल हा शब्द रायगड जिल्ह्यातील महादेव कोळी समाजात आणि आरगोना हा शब्द साळी समाजात आढळून आला आहे. आटकवनं हा शब्द पालघर, नाशिक आणि वाशिम या जिल्ह्यांत, आटकावा हा धुळे जिल्ह्यात, आडकावा हा नागपूर जिल्ह्यात, अटकाऊ हा जळगाव जिल्ह्यात तर आडकवनी हा अहमदनगर जिल्ह्यात आढळून आला आहे. अडकन हा शब्द धुळे, जळगाव, पालघर आणि भंडारा जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. तर आडकन हा शब्द हिंगोली जिल्ह्यात अपवादात्मक आढळला आहे. अडकनी हा सांगली, आडखणा हा जळगाव, आडकुन, आडकी हे ठाणे जिल्ह्यात आढळले. अडकळी, अडखळ हे शब्द ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत तर आडकळ हा बुलढाणा जिल्ह्यात दिसून आला आहे. आडकोटा, आडका हे कोल्हापूर जिल्ह्यात, आडसर हा जालना जिल्ह्यात आढळला. हे शब्द अतितुरळक प्रमाणात दिसून येतात.

आडची हा शब्द पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यात दिसून येतो. या शब्दाचे कडची असे शब्दवैविध्य आढळते. आडका हा शब्द कोल्हापूर, नागपूर, धुळे, नांदेड या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळला. याचे आडक, आडोका, आडोखा, आळोखा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. आकडा हा शब्द लातूर, आडव हा शब्द सिंधुदुर्ग आणि यवतमाळ, आडाता हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात, आडत्या, आडती हे शब्द नाशिक जिल्ह्यात, तर आडामो हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजात आढळून आला आहे. आडशा हा शब्द पालघर जिल्ह्यातील कोकणा समाजात तर आडशी हा शब्द रायगड जिल्ह्यात दिसून आला आहे.

खिट्टी हा शब्द रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळून येतो. अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, सोलापूर, सांगली, वाशिम या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे खिट्टी, कीट्टी, खिटी, खुट्टी, गिट्टी, खुटी, कुटी, खुट्ट्या, खुट्टा, खुटा, खुंटी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कट्ट्या हा शब्द जळगाव जिल्ह्यातील वडार समाजात आढळून येतो. खिली हा शब्द ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत प्रामुख्याने आढळून येतो. तसेच नाशिक, पालघर, रायगड, पुणे, भंडारा ह्या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे खिळी, खिल्ली, खिल्ली, किली, खिल, खिळं, खिल्या, खिली इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. खटका हा शब्द प्रामुख्याने नाशिक, वर्धा, अहमदनगर, अमरावती ह्या जिल्ह्यांत आढळतो. कोल्हापूर, सातारा, बीड, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. खटका, खटकी, खटके, घुटका, खुटका, गुटका इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. बोलींमध्ये 'ख' या ध्वनीचे 'घ' तसेच 'ग' असे रूप्यंतर होताना दिसून येते.

दांडू हा शब्द नांदेड जिल्ह्यात अधिक प्रमाणात दिसून आला आहे. सोलापूर, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, ह्या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. दंडका, दंड्या, दंडा, दांडी, दांडू, दांगू, दामरु, दट्टा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

टापरा हा शब्द पालघर जिल्ह्यातील वारली, वाडवळी आणि कातकरी समाजात आढळून येतो. या शब्दाचे टपरं, टापे, टापरे, टापोरा, ठेपरा, टापुरा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. डांबरिया हा शब्द पालघरच्या डहाणू तालुक्यातील वारली, मल्हार कोळी, मांगेला कोळी, कातकरी आणि नांदेडच्या किनवट तालुक्यातील महादेव कोळी समाजात दिसून आला आहे. या शब्दाचे डांबरिया, डांबर्‍या, डांबरी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. माकडी हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुडाळ गावात आणि सावंतवाडी तालुक्यातील कोलगावात तर सांगली जिल्ह्यातील शिराळे तालुक्यातील शिराळा खुर्द या गावात आणि रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या गावात आढळून आला आहे. यामध्ये माकटी, माकली इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले.

बिज़ागरी हा शब्द ठाणे, नाशिक, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे बिज़ागरा, बिजागरा, बिजीगिरी, बिझ़ागरी, बीझ़ागर्‍या, मिच़गार्‍या, मिच़गारी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. प्रमाण मराठी बोलीमध्ये दरवाजाच्या चौकटीसोबत दरवाजाची जी जोडणी असते त्याला बिजागरी असे म्हटले जाते. बोलींमध्ये या शब्दाचा अर्थविस्तार झाल्याचे दिसून येते.

फळी हा शब्द बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक ठाणे जळगाव, बुलढाणा, वर्धा, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे फडी, फाळ, फळी, फळ्या, लाकडी फळी, इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच फिरकी, फिरकनी, फाटक, फाटकी, इ. शब्दवैविध्यदेखील दिसून येते. फ्लाय - इंग्रजी भाषेमध्ये लाकडी फळी या संकल्पनेसाठी असलेल्या ‘प्लाय’ या शब्दाशी साधर्म्य दाखवणारा हा शब्द जळगाव जिल्ह्यात (ता. चाळीसगाव, गाव दहीवड) येथे मिळाला आहे. पट्टी हा शब्द नांदेड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येतो. महाराष्ट्राच्या इतर भागात हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे पाटे, पट्टी, पट्ट्या, पटं, पटा, पाटी, पल्ला इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

टिचकनी हा शब्द गडचिरोली, नागपूर, गोंदिया, वर्धा, चंदपूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आढळून येतो. हा शब्द प्रामुख्याने गोंड समाजात दिसून आला आहे. या शब्दाचे टिच़कनी, टिचकनी, टच़की, टिचनी, टिच़ंकनी, टिच़कनी, टुच़ुकुनी, टिच़कनी, टिपसनी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. चकनी/च़कनी हा शब्द भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील धारगावमध्ये या शब्दांचा वापर दिसून आला आहे. च़िटकनी हा शब्द जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंधळी गावात, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पाडसुळ गावात तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील थार गावात आढळून आला आहे. या शब्दाचे च़िटकनी, चिटकणी, चिटखनी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. सटकनी हा शब्द प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील हळबा समाजात आढळून येतो. तर अमरावती, जळगाव, नाशिक, पालघर, औरंगाबाद या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे सटकनी, सटकने, सटकी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

संकल हा शब्द प्रामुख्याने भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांतील गोंड समाजात आढळून येतो. तसेच या भौगोलिक प्रदेशातील कोहळी समाजातील भाषकांमध्ये आणि नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भोजापूर गावातील तेली समाजात तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे संकल, संकली, संकलकडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

साखळी हा शब्द विदर्भात, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत तसेच धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांत आढळून येतो. हा शब्द प्रामुख्याने मोठ्या वयोगटातील लोक जास्त वापरतात असे दिसते. या शब्दाचे साक्री, साखर्‍या, साख्री, साक्र्या, साकडी, साकय, साकळ, साखई, साकुई, साखळी, साकळी, साकळीकोंडा, साकरीकोंडा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

हॅन्डल हा शब्द गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, बीड, जालना या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. या शब्दाचे ह्यांन्डल, हॅन्डल, हॅन्गर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. रॉड हा शब्द उस्मानाबादमधील लिंगायत समाजात तर रिप हा शब्द यवतमाळ जिल्ह्यात दिसून आला आहे. ड्राफ़्ट हा शब्द अमरावती जिल्ह्यात तर लाकूड हा शब्द ठाणे, बीड, नांदेड, जळगाव या जिल्ह्यात दिसून आला आहे. लाकडी टिपला हा शब्द भंडारा जिल्ह्यात, वडच़न/वडन्याची कडी हे शब्द उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत, भोंगा हा शब्द अमरावतीच्या धारणी तालुक्यातील कोरकू समाजात तर झ़डप हा शब्द पुणे जिल्ह्यात काही अंशी आढळून आला आहे.ट्राक हा शब्द रायगड जिल्ह्यातील कोर्लई या गावात क्रेओल भाषिकांमध्ये मिळाला.

लॉक हा शब्द प्रामुख्याने बीड, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात दिसून आला आहे. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण विभागात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे. या शब्दाचे लॉक, लॅक, लोक, लाक, लाख, क्लाक, लॉकर, लाकर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

कुलाबा हा शब्द अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात आढळून येतो. या शब्दाचे कुलाबी, किलाबा, कुलाबा, कब्जा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. कुपी हा शब्द नाशिक जिल्ह्यातील महादेव कोळी समाजात, कुलापा हा शब्द धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत, तर किलीप हा शब्द सातारा आणि वर्धा जिल्ह्यांत आढळून आला आहे. किरचन आणि कोलदंडी हे शब्द सोलापूर जिल्ह्यात दिसून आले आहेत. ठोकळा हा शब्द उस्मानाबाद, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांत आढळून आला आहे. साना हा धुळे जिल्ह्यात, शिपी हा नाशिक जिल्ह्यात, शिडी हा जालना जिल्ह्यात, तर शिंयागा हा अमरावती जिल्ह्यात आढळून आला आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दांडवळ गावात वारली, महादेव कोळी आणि ठाकूर समाजातील भाषकांमध्ये कुत्रा/कुत्रं हा शब्द जास्त प्रमाणात आढळला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड गावातील महादेव कोळी समाजात तर सुरगणा तालुक्यातील सुरगणा गावातील कोकणा समाजात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे. ठाणे जिल्ह्यात ठाकूर आणि बौद्ध समाजात, रायगड जिल्ह्यात ठाकूर समाजात, औरंगाबाद जिल्ह्यातील भिल्ल आणि मराठा समाजात, यवतमाळमध्ये मरार समाजात, नांदेडमध्ये मराठा, मातंग आणि अंध समाजात, नागपूर आणि अमरावतीमध्ये बौद्ध समाजात, वर्धा जिल्ह्यामध्ये भोई समाजात, तर चंद्रपूर जिल्ह्यामधील गोंड समाजात या शब्दाचा वापर दिसून आला आहे. रायगड, ठाणे, परभणी, अकोला, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत सदर संकल्पनेकरिता घोडा हा शब्द दिसून आला आहे. तर घोडी हा शब्द अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात आढळून आला आहे. माज़रबोक्या/ माज़र हा शब्ददेखील याच जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात आढळला आहे. पूर्वी बऱ्याचदा कुत्रा, घोडा, मांजर हे प्राणी घराच्या दाराशी संरक्षणासाठी असायचे. घराच्या दाराला असणारा आडनाही घराच्या संरक्षणाचेच काम करत असल्याने हे शब्द काही ठिकाणी या संकल्पनेसाठी वापरत असावेत.

तासन हा शब्द ठाणे जिल्ह्यात, तडी हा शब्द अमरावती जिल्ह्यातील कोरकू समाजातील भाषकांत तर टट्टा हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील गोंड समाजात आढळून आला आहे. ढोका, बिट हे शब्द रायगड जिल्ह्यातील डोंगर कोळी व महादेव कोळी समाजातील भाषकांमध्ये दिसून आले आहेत. बरकाशा हा शब्द जळगाव जिल्ह्यातील पायली समाजात तर बावटी हा शब्द अकोला जिल्ह्यात काही अंशी दिसून आला आहे.

घोल हा शब्द धुळे, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळला. या शब्दाचे घुली, घुळी, घुडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. आकुडा हा शब्द नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भोजापूर गावात तर आकुचा हा शब्द भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील लोभी गावातील गोंड समाजात आढळून आला आहे. आंधरा हा शब्द ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजात तर च़ावर हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला आहे.

हाकल हा शब्द नंदुरबारच्या भिल्ल समाजातील भाषकांत, हालका हा शब्द ठाणे जिल्ह्यातील ठाकूर समाजात दिसून आला आहे. सटल/सकल हा शब्द जळगाव जिल्ह्यातील धनगर आणि कोळी या समाजातील भाषकांच्यात आढळून येतो, तर संटल हा शब्द जळगाव जिल्ह्यातील गुजर समाजात, सपळा हा शब्द लातूर जिल्ह्यात, आणि सपुट हा शब्द औरंगाबाद जिल्ह्यात आढळून आला आहे. लालगोंडी हा शब्द सोलापूर जिल्ह्यात तर मुसय हा शब्द नंदुरबार जिल्ह्यात आढळून आला आहे. मूट हा शब्द नाशिक जिल्ह्यात तर भाला हा शब्द रायगड जिल्ह्यात दिसून आला आहे. पॉरतं/पॉरचं हे शब्द रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील ख्रिश्चन समाजात दिसून आले आहेत.